नमस्कार मी डॉक्टर विशाल राठोड,
सर्वप्रथम Yoga Today ब्लॉग च्या वाचकांचे खूप खूप स्वागत. मी सुद्धा या ब्लॉग चा नियमित वाचक असून सदर ब्लॉग मध्ये योगासनाबद्दल दिलेली माहिती हि निरोगी जीवनशैली साठी फार उपयोगाची आहे. आता ऊन तापायला सुरुवात झाली आहे. या तापमानवाढी मुळे उष्माघाताचा बातम्या आपण वृत्तपत्रांमधून वाचतो. उष्माघात म्हणजे काय? उष्माघात कश्यामुळे होतो? त्यापासून बचावा करिता आपण घरघुती काय उपाययोजना करू शकतो. या बद्दल ची माहिती आपल्या वाचकांना उपलब्ध व्हावी, त्यासाठी ह्या ब्लॉग च्या निर्मात्याने मला उष्माघाताबद्दल माहिती देण्याची विनंती केली होती. त्या अनुषंगाने सदर ब्लॉग मध्ये मी उष्माघाताबद्दल सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करीत आहे. उष्माघात म्हणजे काय?
सुरुवातीला आपण उष्माघात म्हणजे काय? हे जाणून घेऊयात.
उष्माघात म्हणजेच हिट स्ट्रोक (heat stroke) शरीराने गरजेपेक्षा जास्त उष्णता निर्माण केली किंवा शोषून घेतली तर अतिउच्च तापमानाचा आजार होतो त्यालाच हायपरथर्मिया (hyperthermia) असे म्हणतात. आणि उष्माघात हा त्याचाच एक प्रकार आहे. खूप कडक उन्हात काम केल्याने किंवा प्रखर तापमानामध्ये बाहेर पडल्याने अनेक शारीरिक समस्या निर्माण होतात व आपल्याला उष्माघात होतो. उष्माघातामुळे शरीरातील तापमान नियंत्रित करण्याची प्रणाली खराब होते तसेच मेंदू, हृदय, मूत्रपिंड अश्या अंतर्गत अवयवांना हानी पोहचू शकते.
उष्माघाताची काही प्रमुख लक्षणे
उष्माघाताची लक्षणे हि वेगवेगळ्या व्यक्तींसाठी वेगवेगळी असू शकतात. त्यातील काही ठराविक कारणाबद्दल आपण माहिती घेऊयात
- तळहात, तळपाय ची अंगार(दाह) होणे
- नाकातून रक्त येणे
- मळमळ
- उलट्या
- डोकेदुखी
- चक्कर
- सतत थकवा येणे
- ताप येणे
- रक्तदाब वाढणे
- निरुत्साही वाटणे
- बेशुद्ध अवस्था इत्यादी
प्रतिबंधात्मक उपचार
उष्माघातामध्ये शरीराचे तापमान खूप वाढते तेव्हा थंड पाण्याच्या पट्ट्या डोक्यावर ठेवाव्या आणि शरीराचे तापमान नियंत्रित करावे.
रुग्णाला हवेशीर खोली मध्ये ठेवावे.
मधुर अम्ल लवण रसाचा आहार बलवर्धनास उपयुक्त असल्याने उन्हाळ्यामध्ये तृष्णा शमनार्थ(तहान भागविण्यासाठी ) अम्ल गुणी म्हणजेच चिंचेचा कोळ, निंबु शरबत, कोकम, आमसुलं अश्या पेयांचा पातळ स्वरुपात वापर वाढवावा.
उन्हाळ्यामध्ये सहज उपलब्ध असणाऱ्या टरबूज, खरबूज, आंबा, द्राक्ष, डाळिंब सारखी रसाळ फळे सूर्यास्त पूर्वी खावी.
शरीराचा रस धातू बल व पाण्याचे प्रमान नियंत्रीत करतं असल्याने उष्ण, अतीमसालेदर पचनाला जड आहार टाळावा.
भरपूर पाणी, प्यावे बाहेर जाताना नेहमी सोबत पाणी घेऊन जावे.
सुती-सैल कपडे वापरावे.
कान, नाक, डोळे, पंचेंद्रियांचे उष्णते पासून सौरक्षण करावे.
उन्हात फिरताना डोके, कान सुती वस्त्राने बांधावे.
सतत उष्णतेचे त्रास राहत असल्यास सब्जा बीज, काळी बीयाचे मनुक्का, वाळा सिद्ध पाणी चे सेवन करावे तसेच नाभीच्या ठिकाणी चंदनाच्या लेप करावा.
आयुर्वेदिक उपचार
उष्माघातामुळे दाह जास्त असल्यास चंद्रकला रस, प्रवाळ, उपळसरी चूर्ण, चंदनासव अश्या औषधाची योजना वैद्यांच्या सल्ल्याने करावी.
आहार,विहार, पथ्य योजना प्रकृती अनुसार वैद्याकडून करुन घ्यावी.
महत्वाची सूचना - उष्माघात हा जीवघेणा आजार आहे त्यामुळे जास्त त्रास असल्यास तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा किंवा जवळच्या दवाखान्यात जाऊन उपचार घ्यावे .

Comments
Post a Comment
आपल्या सुचनांचे स्वागत आहे.
भेट दिल्या बद्दल धन्यवाद. 🙏