संतुलित आहार व त्याचे फायदे
रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी योगासना बरोबर पोषक व संतुलित आहाराची(Balanced Diet) सुद्धा गरज असते. आज आपण संतुलित आहार म्हणजे काय? आणि तो कोठून व कसा मिळेल या बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
संतुलित आहार म्हणजे शरीराला योग्य रीतीने काम करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पोषक तत्वांची योग्य मात्रा. या मध्ये सर्व खाद्य गटातील विविध पदार्थांचा योग्य प्रमाणात समावेश असतो ज्यामुळे तुम्हाला कर्बोदके, प्रथिने, जीवनसत्वे आणि खजिने या सारखे आवश्यक पोषक घटक योग्य प्रमाणात मिळतात. संतुलित आहारामुळे आपण निरोगी राहतो, आपले वजन नियंत्रणात राहते व जुनाट आजारापासून आपला बचाव होऊ शकतो.
असे म्हणतात कि सकाळचा नाश्ता हा राजकुमारासारखा असावा, दुपारचे जेवण हे राजाप्रमाणे असावे आणि रात्रीचे जेवण हे एखाद्या भिकाऱ्याप्रमाणे असावे. यामुळे आपले पचनतंत्र सुरळीत चालते. आपल्या शरीराचे कार्य सुरळीत चालण्यासाठी पोषक अन्न खूप महत्वाचे असते दररोजच्या जेवणातून शरीरात ते योग्य प्रमाणात गेले नाहीत तर आपले आरोग्य बिघडते. संतुलित आहार आपल्यासाठी महत्वाचा का आहे याची काही प्रमुख कारणे आपण बघुयात.
पोषक घटकांची पूर्तता: आपल्या दैनंदित जीवनात संतुलित आहार असल्यामुळे आपल्याला आवश्यक असलेली कर्बोदके, प्रथिने, चरबी (फॅट), जीवनसत्वे आणि खनिजे यासह सर्व आवश्यक पोषक तत्वे आवश्यक प्रमाणात मिळतात.
वजन नियंत्रण: संतुलित आहाराच्या सेवनामुळे आपल्या शरीराला आवश्यक प्रमाणात कॅलरिझ मिळतात त्यामुळे आपण आपले वजन नियंत्रणात ठेऊ शकतो.
ऊर्जा : संतुलित आहार घेतल्याने आपल्या शरीराला सतत ऊर्जेचा पुरवठा मिळत राहतो. कर्बोदके म्हणजे carbohydrates हे आपल्या शरीरातील ऊर्जेचा प्राथमिक स्रोत आहेत आणि संतुलित आहार आपल्याला उर्जावान राहण्यासाठी योग्य प्रमाणात कर्बोदके मिळवून देतो.
रोग प्रतिबंधक: विविध प्रकारच्या पोषक अन्नाच्या सेवनामुळे हृदयविकार, मधुमेह, आणि काही विशिष्ठ प्रकारचे कर्करोग या सारख्या जुनाट आणि दुर्धर आजारांचा धोका कमी होण्यास मदत होते. आपल्या दैनंदिन आहारात जीवनसत्वे आणि खनिजे पुरेश्या प्रमाणात घेतल्यास आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते आणि आपला संक्रमण आणि आजारांपासून बचाव होतो.
पचनशक्ती : संतुलित आहारामध्ये विविध प्रकारची फळे मोड आलेली धान्य यांचा समावेश असतो त्यामुळे आपल्या शरीराला फायबर योग्य प्रमाणत मिळते व आपले पाचन कार्य सुधारते. त्यामुळे बद्धकोष्ठते चा त्रास नाहीसा होतो.
संज्ञात्मक कार्य : मेंदूच्या आरोग्यासाठी आणि संज्ञात्मक कार्यासाठी योग्य पोषण आवश्यक आहे. ओमेगा-३, फॅटी ऍसिड, अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्वे या सारख्या पोषक घटकांचा स्मृती आणि मानसिक आरोग्य चांगले राखण्यासाठी मदत होते.
त्वचा आणि केसांचे : संतुलित आहारातून मिळणारी पोषक तत्वे निरोगी त्वचा आणि केसांसाठी खूप योगदान करते. जीवनसत्वे आणि खनिजे त्वचा आणि केसांच्या पेशींच्या वाढीस आणि दुरुस्तीस मदत करतात.
मानसिक आरोग्य : तुम्ही खात असलेले अन्न तुमच्या मनःस्तिथीवर आणि भावनिक आरोग्यावर लक्षणीय परिणाम करते. पोषक समृद्ध अन्न मनःस्तिथी स्थिर करण्यासाठी आणि मानसिक विकार टाळण्यासाठी खूप मदत करते.
दीर्घायुष्य आणि जीवनाची गुणवत्ता : संतुलित आहार दीर्घ, निरोगी आयुष्याशी संबंधित आहे. हे जीवनाची गुणवत्ता वाढवते आणि आहार संबंधित रोगामुळे होणाऱ्या अकाली मृत्यू चा धोका कमी करते.
शेवटी चांगले आरोग्य राखण्यासाठी आणि विविध आरोग्य समस्या टाळण्यासाठी संतुलित आहार महत्वाचा आहे. आपल्या शरीराला आवश्यक असलेली पोषक तत्वे मिळतील याची खात्री करण्यासाठी योग्य प्रमाणात विविध प्रकारचे अन्न खाणे आवश्यक आहे.
आपल्या आहार मध्ये कर्बोदके आणि सिंग्ध पदार्थांचे असणे गरजेचे आहे. तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी
कंदमुळे- बटाटे, रताळी, सुरण, साखर, गूळ, या मधून आपल्याला कर्बोदके मिळतात व साय, तूप, लोणी, तेल, वनस्पती तूप, चीज या मधून आपल्याला सिंग्ध मिळतात.
आहारामध्ये आणखी एक महत्त्वाचा अन्नघटक म्हणजे फायबर. फायबर चे मुख्य स्रोत म्हणजे आख्खी सालासकट फळे जसे सफरचंद, संत्रे, द्राक्षे, पेरू, कलिंगड अंजीर इत्यादी. सालासकट धान्य, कडधान्य व भाज्या इत्यादी. सर्व पालेभाज्या, तोंडली, भेंडी, फ्लॉवर, कोबी, काकडी, टोमटो, गाजर यामध्येही फायबर असते. ज्या लोकांना बद्धकोष्टता व पाइल्स सारखा त्रास आहे त्यांनी फायबर असलेल्या पदार्थांचे भरपूर सेवन करावे.
शरीर निरोगी व सुदृढ ठेवण्यासाठी संतुलित व पोषक आहार घेणे आवश्यक आहे. एकूणच शरीर सुदृढ ठेवण्यासाठी पूर्ण दिवसात पोळी, भात, आमटी, विविध भाज्या, कोशिंबिरी, दूध, फळे या सगळ्यांचा समावेश असावा .
Comments
Post a Comment
आपल्या सुचनांचे स्वागत आहे.
भेट दिल्या बद्दल धन्यवाद. 🙏