अर्ध शलभासन
येथून पुढे आपण पोट जमिनीला टेकवून करायची आसने बघुयात. शलभासनाचे दोन प्रकार आहेत. हे आसन एका पायाने करण्यात येते म्हणून या आसनास 'अर्ध शलभासन'(ardha shalbhasana) असे म्हणतात. या आसनाच्या नित्य सरावामुळे बद्धकोष्टता, वातविकार, अपचन, जुलाब होणे असे विकार दूर होतात. भुजंगासनामुळे शरीराच्या वरील भागास फायदा होतो तर शलभासनामुळे शरीराच्या कमरे खालील अवयव मजबूत बनतात. अर्ध शलभासनाची कृती आणि फायदे या बद्दल संपूर्ण माहिती खाली आपल्या मायबोली मराठी भाषेत उपलब्ध आहे. (Ardha-Shalbhasana Benefits and information in Marathi)
कृती:
- प्रथम जमिनीवर पालथे झोपा.
- हनुवटी जमिनीवर टेकवा.
- हात शरीराच्या दोन्ही बाजूंना लागून शरीराला सामन्तर ठेवा.
- दोन्ही हातांच्या मुठी वळलेल्या स्तिथीत ठेवा किंवा दोन्ही हात मांड्या खाली ठेवले तरी चालतील.
- आता श्वास आत खेचा, संपूर्ण शरीर एकदम ताठ करा आणि एक पाय जमिनीवर ठेऊन दुसरा पाय हळू हळू वर उचला, पाय जितका वर नेता येईल तितका वर न्या.
- पाय वरती नेत असताना तो गुडघ्यामध्ये वाकणार नाही याची काळजी घ्या.
- तसेच आपली हनुवटी सुद्धा जमिनीला टेकलेली राहील याची सुद्धा काळजी घ्या.
- आता पायाचे चवडे ताणा. कमीत कमी तीस सेकंदा पर्यंत या आसन स्तिथीत रहा.
- हळूहळू पाय खाली आना. आता धीम्या गतीने श्वास बाहेर सोडा.
हीच कृती आता दुसऱ्या पायाने करा. हे आसन दररोज सहा ते सात वेळा करता येते. .
फायदे:
- या आसनाच्या नित्य सरावामुळे पोट व्यवस्थित साफ होते.
- बद्धकोष्टता, वातविकार, अपचन, जुलाब होणे तसेच पोटात व आतड्यात उध्दभवणारे विकार या आसनाच्या नित्य सरावाने दूर होतात.
- या आसनाच्या नित्य सरावामुळे मूळव्याध, पायांच्या तळव्यांचे विकार या सारखा त्रास कमी होतो.
- गुडघे, नितंब, कंबर, आणि पोटावर वाढलेली चरबी कमी होते.
- या आसनाच्या नित्य सरावामुळे स्रीयांचा कंबरदुखीचा त्रास कमी होतो.
- या आसनामुळे पोटाला चांगला व्यायाम मिळतो.
- मूत्राशयावर व हृदयावर चांगला ताण पडल्याने ते कार्यक्षम बनतात.
- अंडकोषांतील नाड्यादेखील या आसनामुळे मजबूत बनतात.
Comments
Post a Comment
आपल्या सुचनांचे स्वागत आहे.
भेट दिल्या बद्दल धन्यवाद. 🙏